Categories
Articles

मी कोण आहे?

माझा जन्म झाला आणि माझ्या आईवडिलांनी माझे नाव हेमंत ठेवले. मला याचं नावाने सर्वजण ओळखतात. मी माझी ओळख माझे नाव हेमंत म्हणूनच सर्वाना करून देतो. जर माझ्या आईवडिलांनी माझे नाव दुसरे काही ठेवले असते तर सर्वानी मला त्या नावाने ओळखले असते. म्हणजे माझे नाव हेमंत हि माझी खरी ओळख नाही. मग माझे शरीर माझी ओळख आहे का? जन्माच्या वेळेला माझ्या शरीराचा आकार वेगळा होता. जडणघडण वेगळी होती. दहा वर्षांपूर्वी ती आणखी वेगळी होती. आज ती त्याहूनही वेगळी आहे. मग माझे शरीर हि माझी ओळख नाही. जर माझे नाव माझे शरीर जर माझी ओळख नसेल तर या भौतिक ओळखीच्या पलीकडचा नक्की मी कोण आहे?

जीवशास्त्रात लामार्कच्या तत्वानुसार ज्या अवयवांचा वापर करणे आपण बंद करतो तो अवयव काळाच्या ओघात नष्ट होतो. तसेच जो अवय अधिक वापरतो त्याची प्रगती अधिक होते. माणसाने आपली शेपटी, तिसरी पापणी वापरणे  सोडले व उत्क्रांतीत आपण हे दोन्हीही अवयव गमावले. मानवाने मेंदूचा वापर अधिक सुरु केला, परिणामी मानवाच्या मेंदूचा अधिक विकास झाला. या तत्वानुसार माणसाने आपली पचन संस्था, प्रजोत्पादन संस्था, व इतर संस्थांचा वापर बंद केला तर काळाच्या ओघात त्या नष्ट होतील. अशाप्रकारे शरीरातील सर्व संस्था नष्ट होऊन शेवटी सर्व शरीर नष्ट होईल पण त्यानंतर सुध्द्दा जे उरेल जे या सर्व शरीराला नियंत्रित करत होते ते मुलतत्व मी आहे. माणूस मेल्यानंतर शरीराला कोणी नावाने हाक मारत नाही. बॉडी आली का? बॉडी नेली का? असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे जिवंत असताना जे तत्व त्या शरीरात होते ते मूलतत्व शरीरातून निघून गेले कि शरीराचे स्वतंत्र अस्तित्व संपते. शरीर नष्ट होते पण हे मुलतत्व कायम राहते. ते तत्व म्हणजे मी आहे. या मूलतत्वाला आत्मा असे संबोधले जाते व ते परमात्म्याचा अंश आहे. आत्मा शरीरात नक्की कोठे असतो असा प्रश्न आहे. आत्मा म्हणजे चेतना त्याचे अस्तित्व शरीराच्या प्रत्येक पेशीत आहे. पेशींच्या प्रयेक अणुरेणूत आहे.

मग पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे माझ्या जन्माचे प्रयोजन काय? मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. भौतिकशास्त्रानुसार प्रत्येक परिणामाला कारण आहे व प्रत्येक कारणाला परिणाम आहे. मग नक्कीच माझ्या जन्माला कारण आहे. माझा जन्म ह्याच घरात का झाला? हेच माझे आईवडील का? हीच माझी पत्नी का? हीच माझी  मुले का? हेच माझे नातेवाईक का? हेच माझे मित्र मत्रिणी का? या सर्वाला एक प्रयोजन आहे. कोणीही आपल्या आयुष्यात उगाच येत नाही तसेच कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात उगाच घडत नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीशी अगदी थोडयावेळासाठी आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीशी आपण कर्मबंधाने आपण जोडलेलो असतो. आपला जन्म हा मागील कर्मातून व चूकातून सुधारण्यासाठी आहे तसेच मागील कर्मबंध पूर्ण करण्यासाठी असतो.

हे मी कसे करू शकतो? माझ्या गुरूंनी यावर काही चांगले मार्ग सांगितले आहे. त्यातील पहिला मार्ग गुरूच्या मागे धावू नका. तुमची आत्मशक्ती व योग्यता वाढवा. तुमची योग्यता वाढल्यास तुमचा गुरु तुमच्या आयुष्यात स्वतः येतो. दुसरा मार्ग योग्यता वाढविण्यासाठी घरदार सोडायची गरज नाही. जो पर्यंत तुम्ही तुमचे कर्मबंध पूर्ण करत नाहीत तो पर्यंत तुमची अध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. त्यामुळे जे आयुष्यात आहे ते तुम्हाला अनुभवावे लागेल. त्यातून शिकणे म्हणजेच योग्यता वाढविणे आहे. जर या अनुभवातून शिकलो नाही तर ते प्रसंग आपल्याआयुष्यात वारंवार घडतात. जसे दहावीच्या परीक्षेला काही विषय असतात. त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ज्या विषयात आपण कमी पडतो तो विषय आप्ल्यायला परत परत द्यावा लागतो. सर्व विषयात उत्तीर्ण झालो कि दहावी पस होतो. त्यानंतर आणखी परीक्षा. हा जन्म शिकण्यासाठी आहे त्यामुळे प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी शिक्षक आहे. आपल्या आयुष्यात न शिकता आपण त्या चुका करत राहिलो तर जोपर्यंत आपण शिकत नाही तो पर्यंत तशाच घटना वारंवार आयुष्यात घडणार.

पुढे त्यांनी योग्यता आणखी कशी वाढवावी याची माहिती दिली. आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी , घटनेसाठी, क्षणांसाठी कृतज्ञता व्यक्त करा. आपण ज्या समाजात राहतो त्याचे आपण देणे लागतो हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या माणसासाठी आपण खूप करतो. ते आपले कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला यात मोजू नका. जे तुमचे आप्त नाहीत. मित्र मैत्रिणी नाहीत. अशासाठी तुम्ही काही तरी केले पाहिजे. जगताना प्रत्येक क्षणी तुमच्या मनात करुणा  भाव असला पाहिजे.समोरच्याला प्रतिक्रिया देण्या ऐवजी मनात क्षमाशीलतेचा भाव असला पाहिजे. जेव्हा तुमच्या मनात कृतज्ञता, करुणा, क्षमाशीलता कायम असेल तर आपल्याला कर्मबंधातून लवकर मुक्ती मिळते. आणि शेवटचं टप्पा आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. या टप्प्यात आपल्याला प्रत्येक व्यक्तीत, प्राण्यात प्रत्यक्ष स्वतःचे म्हणजे परमात्म्याचे दर्शन होते. त्यांनी सांगितलेले मार्ग कोणीही व्यक्ती नेहमीच्या आयुष्यात अवलंबू शकते. त्याचबरोबर हठयोग, कर्मयोग, राजयोग, आणि भक्तियोग यापैकी एकाच वापर करू शकते. नामस्मरण हा उत्तम व सोपा मार्ग आहे.

आयुष्याचा हेतू कसा ओळखावा. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो. जी गोष्ट करताना आपण तहानभूक विसरून जातो ते काम आपल्या आयुष्याच्या प्रयोजनाशी संबंधितच असते. प्रत्येकाचा आयुष्याचा हेतू वेगळा आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यातून शिकता येते पण त्याच्या आयुष्याचा हेतू आपल्या आयुष्याचा हेतू होऊ शकत नाही.

आपण कितीही पुस्तके वाचली पण स्वतः:ला ओळखू शकलो नाही तर हा जन्म व्यर्थ आहे. आपण आकाशाला गवसणी घातली अणुरेणूंच्या अंतरंगात शिरलो पण आपल्यातील परमात्म्याला ओळखू शकलो नाही तर विज्ञान व्यर्थ आहे.

माझ्या पुढील लेखात आद्य शंकराचार्य लिखित निर्वाणाष्टकं यावर लिहिण्याचे प्रयोजन आहे. मी कोण आहे? याचे उत्तर आपल्याला त्यात सापडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *